मुंबई ( वृत्तसंस्था ) – पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधातून सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या चालकाने पत्नीच्या प्रियकराची हत्या करत चार तुकडे करून झाडावर लटकवण्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेने चालक पोलीस नाईक शिवशंकर गायकवाड ( वय ४५ ) याला त्याची पत्नी मोनाली हिच्यासह अटक केली दोघांनाही 14 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सायन विभागाच्या डीएसपींच्या कार्यालयाबाहेर 30 सप्टेंबर रोजी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मुंडके नसल्यामुळे या मृतदेहाची ओळख पटवून आरोपींपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी मृतदेहाच्या हाताच्या टॅटू वरून तपास सुरू केला. परिसरातील मोबाईल टावर लोकेशनच्या मदतीने दादा जगदाळे नावाच्या व्यक्तीचे लोकेशन त्या परिसरात आढळून आले होते.
पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला असता दादा जगदाळे हा सोलापूरचा असल्याची माहिती समोर आली आणि तो गायब असल्याचे देखील लक्षात आल्याने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दादाच्या मोबाईल कॉल रेकॉर्ड मध्ये शिवशंकर व मोनाली संपर्कात असल्याचे समोर येताच त्यांना ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसी खाक्या दाखवतात त्यांनी खुनाची कबुली दिली.
वरळी पोलिस वसाहतीत राहणाऱ्या शिवशंकर याचे पत्नी मोनाली हिच्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशयावरून वारंवार भांडणे होत होती. त्याला कंटाळून ती तिच्या माहेरी अक्कलकोटला निघून गेली. तिथे गेल्यानंतर तिची दादा जगदाळे नावाच्या व्यक्ती सोबत ओळख झाली आणि काही कालावधीतच ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघे सोबत रहायला लागले.
काही कालावधी गेल्यानंतर तिला पुन्हा पतीकडे जाण्याची इच्छा झाली आणि आणि ती घर सोडून पुन्हा मुंबईत पतीकडे आली. दोघांमध्ये आता भांडणे होत नव्हती दरम्यान मोनालीच्या पतिला दादा जगदाळे बद्दल माहिती मिळाली आणि त्यावरून दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले. शिवशंकरने स्वतःवर देखील चाकूहल्ला करून घेतला मात्र मोनालीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याने तिच्या देखील हातावर चाकूचे वार केले. यातून काही साध्य होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवशंकर याने पत्नीला सोबत घेत दादा जगदाळे याच्या खुनाचा प्लॅन रचला.
शिवशंकरने त्याला गोड बोलून मुंबईत आणले आणि त्याची अमानुषपणे हत्या केली. प्रियकराची हत्या झाली हे लक्षात येताच मोनालीने देखील टाहो फोडला आणि पती व तिच्यात पुन्हा भांडणे झाली, मात्र आता पती सोडून कोणाचाच आधार राहिला नाही हे तिच्या लक्षात आले आणि प्रकरण आपल्या घरापर्यंत येऊ नये म्हणून तिने देखील मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पती शिवशंकर याला मदत केली. दोघांनी मिळून जगदाळेचा मृतदेह रात्री सायनच्या एसीपी कार्यालयाबाहेर टाकून दिला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तो जाळण्याचा देखील प्रयत्न केला त्यात ते अपयशी ठरले आणि ही घटना उघडकीस आली.