यावल तालुक्यातील मोहराळा येथील घटना
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोहराळा या गावात एका २८ वर्षीय तरुणाने पत्नी व मुलगा दोघे बेपत्ता झाल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १९ जुलै रोजी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तुषार गोपाळ पाटील (वय २८) हा तरुण त्याची पत्नी वैष्णवी तुषार पाटील (वय २३) आणि मुलगा समर्थ (वय १) यासह मोहराळा गावात राहत होता. दिनांक १६ जुलै रोजी सायंकाळी त्याची पत्नी वैष्णवी पाटील ही मुलगा समर्थ याला सोबत घेऊन आपण यावलला दवाखान्यात जात आहोत, असे सांगून घरून निघाली होती व ती तेव्हापासून मुलासह बेपत्ता झाली. (केसीएन)त्यामुळे पती तुषार पाटील याने शुक्रवारी दिनांक १९ जुलै रोजी दुपारी दोरीच्या साह्याने गळफास घेतला. हा प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
तेथून मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पत्नी आणि मुलगा दोघे हरवल्याच्या नैराश्यातून तूषारने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे, हवालदार राजेंद्र पवार, हवालदार उमेश सानप यांनी माहिती जाणून घेतली.