जळगाव तालुक्यात कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पत्नी मुलीसह माहेरी गेलेली असताना तरुणाने मोबाइलमध्ये चित्रीकरण करीत गळफास घेत आत्महत्या केली. दि. २१ जून रोजी ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रमोद धनराज सोनवणे (३७, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते रंगकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी ८ वर्षीय मुलीसह आसोदा येथे माहेरी गेलेली होती. त्यावेळी घरी एकटेच असलेल्या सोनवणे यांनी घराच्या समोरील दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि चावी शेजारच्यांकडे दिली. त्यानंतर, त्यांनी मागील दरवाजाने घरात जाऊन आतून कडी लावली व गळफास घेतला. पत्नी परतल्यानंतर तिने शेजारच्यांकडून चावी घेत दरवाजा उघडला असता, पती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.(केसीएन)प्रमोद यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रमोद सोनवणे यांनी गळफास घेण्यापूर्वी समोर स्वतःचा मोबाइल ठेवून त्यात चित्रीकरण सुरू केले. दोरी गळ्यात अडकविण्यापासून ते गळफास घेऊन लोंबकळण्यापर्यंत सर्वकाही चित्रित झाले आहे.