चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – पाटणादेवी मंदीर परिसरातील धवलतीर्थ धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी गेलेल्या २० वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. राहूल सुखदेव पवार (वय-२० , रा. डोंगरगांव, मध्यप्रदेश ) असे मृत तरुणाचे नाव आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काही दिवसापासून चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे . पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत . पाटणादेवी शिवारात धवलतीर्थ धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी गेलेल्या राहूल पवार या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली . पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह चाळीसगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला .
पाटणाचे पोलिस पाटील यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पो. नि. संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास ओंकार सुतार करीत आहेत.







