जळगाव तालुक्यातील बोरनार येथील घटनेत २ मुले झाली पोरकी
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बोरनार येथे पती-पत्नीच्या वादात राग उफाळून संतप्त झालेल्या पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दि. १९ रोजी सकाळी ६ ते ७ वाजता घडली होती. यात जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी अडीच वाजता मृत्यू झाला आहे. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.
रेखा आनंदा धामोळे (धनगर, वय ३८) असे मयत पत्नीचे नाव आहे. तर त्यांचे पती आनंदा उर्फ छोटू महारु धामोळे (धनगर, वय ४५) यांनी पत्नीला जखमी केल्यावर म्हसावदजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. या दाम्पत्याला २ मुले असून ते आता पोरकी झाली आहे. शेतीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते.(केसीएन)त्यांचा मोठा मुलगा विनोद याने आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. तर लहान मुलगा पप्पु हा दहावीत शिकत आहे. त्यांच्यासह घरात आनंदा धामोळे यांच्या आई या देखील राहतात. मात्र, त्या दोन दिवसांपासून जळगाव येथे आपल्या मुलीकडे आल्या होत्या. त्यामुळे घरात धामोळे दांम्पत्य व दोन्ही मुलेच होती. मंगळवारी दि. १९ ऑगस्ट रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या आनंद धामोळे यांनी रागाच्या भरात पत्नी रेखा यांच्या डोक्यावर, हातावर कुऱ्हाडीने जबर वार केले होते.
घटनेच्या वेळी धामोळे यांची दोन्ही मुले, विनोद ( वय १९) आणि पप्पू (वय १५) हे खालच्या घरात झोपलेली होती. तर दोन्ही पती-पत्नी वरच्या पत्र्याच्या खोलीत झोपली होती. या हल्ल्यात रेखा धामोळे गंभीर जखमी झाल्या होत्या. पत्नीचा मृत्यू झाला असे समजून, छोटू धामोळे यांनी सकाळी ६ वाजता घराबाहेर पडून म्हसावद रेल्वे गेटजवळ रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रेखा धामोळे धनगर यांना सुरुवातीला खाजगी व नंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दि. २० रोजी दुपारी सव्वा वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले.(केसीएन)मात्र उपचार सुरु असताना दोन दिवसांनी दि. २२ रोजीदुपारी अडीच वाजता रेखा धनगर यांचा मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.घटनेमुळे बोरनार गाव सुन्न झाले आहे.