जळगाव तालुक्यातील लमांजन येथील गिरणा नदीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुक्यातील खर्ची येथून लमांजन येथे नातेवाईकांकडे पत्नीसह गिरणा नदीमार्गे जात असताना नदीतील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने बुडून एका प्रौढाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दि. ४ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. डोळ्यासमोरच पतीचा बुडून मृत्यू झाल्याने तसेच, दीड महिन्याभरापूर्वी मुलाचा मृत्यू झालेला असल्याने पत्नीला मोठा मानसिक धक्का बसला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.
पांडुरंग नामदेव मराठे (वय ५९, रा. शिवाजीनगर, यावल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते पत्नी आशाबाई यांचेसह यावल येथे राहत होते. दीड महिन्यापूर्वी दि. २४ नोव्हेंबर रोजी पांडुरंग मराठे यांचा मुलगा मनोज हा जळगावात गणेश कॉलनी परिसरात सेंट्रिंगचे काम करताना पडून मृत्युमुखी पडला होता.(केसीएन) दरम्यान, शनिवारी पांडुरंग मराठे हे पत्नी आशाबाई यांचेसह एरंडोल तालुक्यात खर्ची येथे आले होते. तेथून लमांजन येथील नातेवाईक गोकुळ मराठे यांचेकडे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास गिरणा नदी ओलांडत असताना नदीत वाळूउपसामुळे पडलेल्या खड्ड्यामध्ये ते पडले. पाणी खोल असल्याने ते बुडायला लागले.
दरम्यान, पत्नी आशाबाई यांनी आरडाओरड केली. परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यांनी पांडुरंग मराठे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. (केसीएन)यावेळी त्यांच्या पत्नीने मन हेलावणारा आक्रोश केला. दरम्यान, गिरणा नदीत वारंवार होणाऱ्या वाळू उपशामुळे खड्डे पडले आहेत. हेच खड्डे लोकांच्या जीवावर उठल्याचे सांगून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. घटनेची एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.