मुक्ताईनगर तालुक्यात पुरनाड फाट्याजवळील घटना ; संतप्त जमावाने डंपर पेटवला
मुक्ताईनगर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पुरनाड फाट्याजवळ दि. २६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीला धडक देत जवळपास ५० ते ६० फुटांपर्यंत फरफटत नेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून संतप्त जमावाने डंपर पेटवून दिला आहे.
मुक्ताईनगर पूर्णाड फाटा येथे सुरू असलेले इंदोर हैदराबाद महामार्गाचे काम हे बी. एन. अग्रवाल ही कंपनी करत आहे. या कंपनीचे मुरूम भरलेले डंपर (एम एच १९ सी एक्स २०३८) हे रस्त्याने जात असताना या डंपरने दुचाकीवर असलेले पती-पत्नी नितेश जगतसिंग चव्हाण (वय ३२), सुनिता नितेश चव्हाण (वय २५), शिव नितेश चव्हाण (वय ७ वर्ष, सर्व रा.मातापुर ता. डोईफोडा जिल्हा बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) या तिघांचा डंपरच्या टायराखाली आल्याने जागीच मृत्यू झाला तर नेहालसिंग नितेश सिंग चव्हाण (वय ११ वर्ष) हा जखमी असून याला पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले आहे.
हे कुटुंबीय दुचाकीने इच्छापुर येथे देवीच्या दर्शनासाठी जात होते. ते कामानिमित्त जळगाव येथे वास्तव्यास आहे. परंतु इच्छापुर येथे जाण्याआधी पूर्णाड फाट्यावर अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. यावेळी घटनास्थळी संतप्त जमावाने बी. एन. अग्रवाल कंपनीचे चालक हे मद्यपान करून नेहमी वाहने चालवत असतात असा आरोप करीत वाहनाची तोडफोड करत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही. उशिरापर्यंत तिघेही मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय शवविच्छेदनासाठी होते. पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.