जामनेर तालुक्यात फत्तेपूर पोलिसांची कामगिरी ; कारसह सव्वालाखांचा मुद्देमाल जप्त
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील फत्तेपूरसह परिसरात गुरे चोरीप्रकरणी पोलीसांचा तपास सुरु असतांना तिघांना पोलीसांनी अटक केलेली आहे. यातील दोघांना ३ दिवसांची तर एकाला २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. पोलिसांनी संशयित आरोपींकडून गुरे चोरी प्रकरणात चारचाकी वाहन ६५ हजार रुपये किमतीची व ६० हजार रुपये रोख असा १ लाख २५ हजार रुपये जप्त केलेले आहेत.
फत्तेपूर येथील दिलीप पंडीत चौधरी यांची बैलजोडी गोद्री रस्त्यांवरील खळ्यातून १३ जानेवारी च्या रात्री चोरी झालेली होती. याच रात्री देऊळगांव गुजरी येथून मधूकर दगडु सनेसर यांची बैलजोडी चोरी झालेली होती. घटनेचा तपास सुरु होण्याअगोदर गोद्री येथून पुन्हा बैलजोडी चोरी झाली. दि. २२ जानेवारी येथील पोकों मुकेश पाटील व दिलीप पाटील हे पोलीस वाहनातून देऊळगांव गुजरी परिसरात रात्रीची गस्त घालत असतांना त्यांना एक चारचाकी वाहनावर संशय आला. वाहनाला थांबवून वाहनातील दोघांची चौकशी केली केली असता त्यांची नावे शेख मुजम्मिल शेख रफीक कुरेशी (वय-३०, रा. माळीखेल कुरेशी वाडा जळगांव जामोद जि. बुलढाणा) व रहिम शहा रहेमान शहा (वय-४४, रा. पिंपळगांव काळे ह.मु. ब-हाण पूर रोड ताजनगर जळगांव जामोद जि. बुलढाणा) अशी असून दोघ संशयित आरोपीनी गुरे चोरल्याची कबूली दिली.
दोघांना जामनेर न्यायालयात हजर केले असता त्यांना ३ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर दि.२३ रोजी पळून गेलेली चारचाकी वाहन क्र.एम एच-२८ बी बी ५२७८ या वाहनांचा मालक शकील खान बुढन खान (वय-३४, रा. ईदगांव प्लॉट शेगांव जि. बुलढाणा) यास शेगांव येथून अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तिघांविरुद्ध अगोदर गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पोलीसांनी आरोपीकडून चारचाकी वाहन किंमत ६५ हजार रुपये व ६० हजार रुपये रोख असे १ लाख २५ हजार रुपयांचा माल जप्त केलेला आहे. ही कारवाई सहा. पो. नि.गणेश फड, पोलीस उप निरिक्षक रियाज शेख, पोहेकों प्रवीण चौधरी, गणी तडवी, पोकों मुकेश पाटील, अरुण पाटील, दिलीप पाटील आदीनी केलेली आहे.