जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- बाईंडींगचे पार्ट टाईम काम देण्याच्या मोबदल्यात पैसे भरण्याचे सांगत संशयिताने एका पेंटरची सुमारे ३ लाख २५ हजार ४०० रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बुधवार दि. १६ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
रोशनशहा रहेमानशहा फकीर (वय ३५.रा. सुप्रिम कॉलनी) हे पेंटरचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. ३ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान एका संशयिताने त्यांच्या फोनवर संपर्क साधत बाईडींगचे पार्टटाईम काम करायचे असून चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखविले. या कामासाठी संशयिताने वेळोवेळी पेंटर यांना पैसे भरण्याचे सांगितले. पेंटर रोशनशहा यांचे अकाउंटवर सुरुवातीला नफा टाकुन जाळ्यात ओढले.
विश्वास संपादन केल्यानंतर संशयिताने तब्बल ३ लाख २५ हजार ४०० रुपये घेतले. मात्र पार्टटाईमचे काम दिले नाही. अथवा तक्रारदाराचे पैसे परत केले नाही. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदाराने एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडली. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहेत.