एक हजारांहून अधिक दुचाकींचा सहभाग अपेक्षित; शहरात उत्साहाचे वातावरण
जळगाव (प्रतिनिधी) – भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा २०२६ निमित्त वातावरण निर्मितीसाठी उद्या (दि.१२ एप्रिल ) सायंकाळी ५ वाजता बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने विराट दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत एक हजारांहून अधिक दुचाकी सहभागी होणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


रॅलीचा मार्ग निश्चित
ही दुचाकी रॅली महाबळ चौकातून सुरू होऊन जनरल वैद्य चौक, महेश मार्ग, रिंग रोड, शिवतीर्थ चौक, शास्त्री टॉवर, सुभाष चौक, झाशी राणी पुतळा, वीर सावरकर पुतळा मार्गे पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे समारोप होणार आहे.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
या रॅलीत युवकांसह युवती व महिलांचा देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. महिला पारंपरिक वेशात तर पुरुष कुर्ता-पायजमा अशा भारतीय पेहरावात सहभागी होणार आहेत. प्रत्येक सहभागी भगवा फेटा परिधान करून व वाहनावर भगवा ध्वज लावून भगवान परशुरामांच्या जयघोषात रॅलीत सहभागी होणार आहेत.
शिस्तबद्ध रॅलीची परंपरा कायम
जळगावातील ही रॅली दरवर्षी सर्वात मोठी आणि शिस्तबद्ध दुचाकी रॅली म्हणून ओळखली जाते. यंदाही मोठ्या संख्येने सहभागी होऊन मागील विक्रम मोडण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. ब्राह्मण समाजाच्या एकतेचा संदेश देत रॅलीतील घोषणांनी शहरातील मुख्य रस्ते दुमदुमणार आहेत.
समारोपात सन्मान सोहळा
रॅलीचा समारोप पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे होणार असून त्यावेळी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जन्मोत्सवासाठी देणगी व श्रमदान करणाऱ्या दानदात्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
सहभागाचे आवाहन
या रॅलीत हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन समाजाची एकजूट दाखवावी, असे आवाहन अध्यक्ष अॅड. ओम त्रिवेदी व महिला अध्यक्षा सौ. पुनम तिवारी यांनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख मनीष पात्रीकर यांनी दिली.








