कजगाव रोडवरील घटना
पारोळा ( प्रतिनिधी ) – शहरात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, कजगाव रोडवर एका दुकानासमोर उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी लक्ष्य केली. या दुचाकीच्या हँडलला लटकवलेली ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने भरदिवसा लंपास केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी रामचंद्र भटू हटकर (वय ५४, रा. शिवकॉलनी, उंदीरखेडे रोड, पारोळा) हे दूध व्यवसायानिमित्त कजगाव रोडवरील ‘गजू पाटील’ यांच्या ढेपच्या दुकानासमोर आले होते. दि. ३० जानेवारी रोजी दुपारी १:१५ वाजेच्या सुमारास त्यांनी आपली होंडा शाइन दुचाकी (क्र. एमएच १९ डीएन ८०१) दुकानासमोर उभी केली होती. दुचाकीच्या उजव्या हँडलला ‘वैभव कृषी केंद्र’ असे नाव असलेली कापडी पिशवी लटकवलेली होती. या पिशवीत एकूण ५,५०,०००/- रुपयांची रोकड होती.
फिर्यादी कामात व्यस्त असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने ही पिशवी लंपास केली. याप्रकरणी रामचंद्र हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी सपोनि चंद्रसेन पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय पवार तपास करीत आहेत.








