पारोळा-म्हसवे रोडवर भीषण अपघात
पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळा-म्हसवे दरम्यान असलेल्या जुन्या राष्ट्रीय महामार्गावर कर्तव्यावरून घरी परत येत असताना शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्यूनर कारने जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना दि. १४ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावना प्रशांत मुळे (वय ५३, रा. श्रीनाथजी नगर, पारोळा) असे मृत शिक्षकेचे नाव आहे. जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका भावना प्रशांत मुळे या म्हसवे ता. पारोळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. सायंकाळी ५ वाजता शाळेचे कामकाज संपवून घरी परत येत होत्या. नव्या हायवे पासून पारोळाकडे येत असणाऱ्या जुन्या हायवेवरील काही अंतरावर त्यांची (एमएच १९ बी टी ०५७२) ही स्कुटी होती. रस्त्याचे काम चालू होते.
त्याचवेळेस समोरून भरधाव वेगाने येणारी (जीजे २६ एके १७५०) फॉर्च्यूनर कारवरील चालक समाधान दिगंबर पाटील (रा अंतुली ता. पाचोरा) याने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात ते खाली पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.