प्रत्येकाने ३ ते ४ मते आणावी, जेणेकरुन महायुतीची सत्ता आलीच पाहिजे !
मंत्री गिरीश महाजन यांचे पारोळा येथील सभेत आवाहन
पारोळा (प्रतिनिधी) : आज सभेला एवढा मोठा जनसमुदाय बसलेला आहे. प्रत्येकाने मतदानाच्या दिवशी आपल्या घरातील ३ ते ४ मते तरी आणावी, जेणेकरून महायुतीची पुन्हा एकदा सत्ता आलीच पाहिजे, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित नागरिकांना केले. ते पारोळा येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला आले असताना बोलत होते.
यावेळी विचारमंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिता वाघ, आ. चिमणराव पाटील, महायुतीचे उमेदवार अमोल चिमणराव पाटील, भाजपचे पदाधिकारी माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, पारोळा-भडगाव मतदारसंघात भाजपचे बंडखोरांची हकालपट्टी आपण केली आहे. आपल्याला उमेदवार अमोल पाटील यांना निवडूनच द्यायचे आहे. आपल्याला राहिलेले काम पूर्ण करायचे असल्याने महायुतीचे सरकार निवडून आणायचेच आहे. आजपासून कामाला लागा. एकाने तीन ते चार मते आणली तरी सरकार येईल. यासाठी आपण प्रत्येकाने मेहनत घ्यावी असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
.
पुढे गिरीश महाजन म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात खूप मोठे मताधिक्य आपल्याला मिळाले. आपण भाजपच्या खासदार स्मिताताई वाघ यांना महायुती म्हणून निवडून दिले आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्व सभांमध्ये मी फिरतोय. मात्र हि पारोळ्यातील सभा खूप मोठी झालेली दिसून येत आहे. आपला उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येईल यात शंका नाही. त्यासाठी आपल्याला घरोघर फिरावे लागेल, असेही महाजन म्हणाले.