पारोळा पोलीस स्टेशनची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : पारोळा शहरांमध्ये धरणगावकडे जाणाऱ्या बायपास रोडवरील चौफुलीवर सार्वजनिक जागी पोलिसांनी शनिवार दि. २२ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दोन संशयित आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी शामकांत एकनाथ पाटील (वय २६ रा. शनी मंदिर चौक, पारोळा) व भिकन तुकाराम पाटील (वय २६,रा. राम मंदिर चौक, पारोळा) यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हंसराज पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने धरणगावकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर चौफुलीवर सापळा रचला. तिथे वर्णनावरील दोन्ही संशयित आरोपी दिसले.
त्यांची अंग झडती घेता शामकांत पाटील यांच्याकडे गावठी कट्टा तर भिकन पाटील यांच्या खिशात दोन जिवंत काडतूस आढळून आले. सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यासह दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
सदर घटनेत कॉन्स्टेबल भूषण राजाराम पाटील यांनी फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव तपास करीत आहेत.