प्रशासनाने १८० तांब्याची, ८ चांदीची नाणी केली जप्त
पारोळा (प्रतिनिधी) :- पारोळा येथील पुरातन मोठ्या राम मंदिराच्या वॉल कंपाऊंडच्या कामादरम्यान खोदकाम करत असताना १८० तांब्याची आणि ८ चांदीची नाणी एका भटुरच्या तांब्यात साठवलेली आढळून आली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या नाण्यांच्या ऐतिहासिक मूल्याबाबत उत्सुकता वाढली आहे.
मोठ्या राम मंदिराच्या चारही बाजूंनी कंपाऊंड बांधण्यासाठी पाया खोदण्याचे काम सुरू असताना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जेसीबीवरील काम करणारे अरुण भोई यांना तांब्यासदृश्य वस्तू दिसली. त्यांनी तात्काळ ही वस्तू राम मंदिराचे मुख्य ट्रस्टी गोपाल अग्रवाल यांना दाखवली. अग्रवाल यांनी लागलीच पारोळ्याच्या तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच, पारोळा तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, ट्रेझरर एच. जे. बोरुडे, एपीआय चंद्रसेन पालकर आणि सर्कल अधिकारी निशिकांत माने यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सापडलेल्या नाण्यांचा पंचनामा करून ती ताब्यात घेतली आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार, तांब्याचे प्रत्येक नाणे साधारणतः २० ग्रॅमचे, तर चांदीचे नाणे १० ग्रॅमचे असावे. यावेळी राम मंदिराचे विश्वस्त ॲड. दत्ता महाजन, कल्पेश अग्रवाल आणि परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ही नाणी कोणत्या काळातील आहेत आणि त्यांचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे, याबाबत पुरातत्व विभागाकडून अधिक तपास होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे पारोळा परिसरातील ऐतिहासिक ठेव्याबद्दल नवीन चर्चांना सुरुवात झाली आहे.