पारोळा ( प्रतिनिधी ) – येथील तहसीलदारांना त्यांच्या चेंबरमध्ये जाऊन शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून धमकावणाऱ्या एका महिलेसह ४ आरोपींच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात तहसीलदारांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळ्याचे तहसीलदार अनिल गवांदे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , नितीन पाटील हे २५ ऑक्टोबरपासून बाजार समितीचा गाळा नंबर ३ च्या समोरील अतिक्रमण हटवावे आणि या गाळ्याची दुरुस्ती बाजार समितीने करावी या मागणीसाठी उपोषणास बसले आहेत . त्यांना पुरावे देऊन वारंवार उपोषण सोडण्याची विनंती केली आहे . मात्र त्यांच्या पत्नीचे ३ नातेवाईक आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक माझ्या चेंबरमध्ये आले आणि तुम्ही नितीन पाटीलच्या मागणीप्रमाणे लेखी का देत नाही म्हणून विचारणा करू लागले . त्यावर त्यांना स्पष्टीकरण देण्यात आले . बाजार समितीने अतिक्रमण काढले आहे , त्या गाळ्याची दुरुस्ती करण्यात येईल हे बाजार समितीने मान्य करून लेखी लिहून दिले आहे , असेही त्यांना आम्ही सांगितले . याबद्दल २ नोव्हेम्बर रोजी उपविभागीय अधिकारी , सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक , महावितरण आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली होती . या बैठकीत त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना उपोषण सोडण्याची विनंतीही करण्यात आली होती . मात्र हे सांगत असताना तिन्ही आरोपी माझ्या अंगावर धावून आले . आरडाओरड करीत त्यांनी तुला बघतोच , तू बाहेर ये , असे धमकावले . त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी बी टी पाटील , वंदना सरदार आदींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला . या आरोपींनी या कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ केली .मी त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी निघालो तेंव्हा नितीन पाटील यांची पत्नी रंजना पाटील माझ्या शासकीय वाहनासमोर आडवी झोपली . त्यावेळीही हे आरोपी आज तुझी नोकरीच घालवतो , असे धमकावत होते . ते माझ्या जीवितास धोका करतील असे समजल्याने मी पोलिसांना कार्यालयात बोलावून घेतले . त्याचवेळी रंजना पाटील शासकीय वाहनातील माझ्या आसनावर चढून बसली आणि तू येथून जाऊच शकत नाही , आणखीही भरपूर लोकांना आम्ही बोलावले आहे असे म्हणत मला या महिलेने शिवीगाळ केली . तिच्या ३ साथीदारांपैकी एकाने या गोंधळात माझ्या चालकांकडून सरकारी वाहनांची चावी हिसकावून घेतली . त्यानंतर मी एका कर्मचाऱ्याच्या मोटारसायकलवरून पोलीस ठाण्याकडे निघालो तेंव्हाही या आरोपींनी मला अडवण्याचा प्रयत्न करीत धक्काबुक्की केली . आजच्याप्रमाणेच ९ नोव्हेंबर रोजी आम्ही गौण खनिजाच्या वाहनावर कारवाई करीत असताना ही महिला रंजना पाटील सरकारी वाहनासमोर आडवी झाली होती . त्यावेळीही आम्ही या महिलेच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे .
तहसीलदारांच्या या फिर्यादीवरून आरोपी नितीन पाटील , त्याची पत्नी रंजना पाटील व रवींद्र पाटील , संदीप पाटील , मनोज पाटील या पाच आरोपींच्या विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गु र न ४३४ / २०२१ भा द वि कलम ३५३ , ३३२, ३४१ , १८६ , ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास स पो नि रवींद्र बागुल हे करीत आहेत .







