अमळनेर सत्र न्यायालयाचा निर्णय, पारोळ्यातील १६ वर्षांपूर्वीची घटना
अमळनेर (प्रतिनिधी) : पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स या फटाक्यांच्या फॅक्टरीत १६ वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तिघा मालकांना अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
पारोळा येथील सावित्री फायर वर्क्स फॅक्टरीत १० एप्रिल २००९ रोजी मोठी आग लागली होती. स्फोटक पदार्थ असल्याने आगीचे लोळ उठत होते. तात्काळ आग पसरून त्या आगीत पारोळा येथील स्त्री, पुरुष कामगार, बाल कामगार यांच्यासह २१ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता.(केसीएन)तर सुमारे ३९ जण जखमी झाले होते. या बाबत पारोळा पोलीस स्टेशनला भा दं वि कलम ३०४(२) , ३३७ , ३३८ , २१२ व स्फोटक कायदा १८८४ च्या कलम ९ (ब )१ (अ), ९ (ब) (१)(ब) तसेच बाल कामगार बंदी नियमन कायदा १९८६ च्या कलम १४ (१ ) प्रमाणे गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे, मनीषा चंद्रकांत शिरोळे या मालकांसह व्यवस्थापक, पर्यवेक्षक आणि कामगार, ठेकेदार अशा ९ जणांवर मृत्यूस कारणीभूत व स्फोटक पदार्थांच्या बाबतीत बेजबाबदारपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात असे आढळून आले होते की, आग लागण्याच्या काही दिवस आधीच कारखान्याच्या परवान्याची मुदत संपली होती. कामगारांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण दिले नव्हते. तसेच सुविधा नव्हत्या, बालकामगारांचे नियम पाळले गेले नव्हते. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता.(केसीएन)या प्रकरणी स्फोटक कारखान्यांबाबत असलेल्या आयुक्तांकडे देखील सुनावणी होऊन जखमी व मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाली होती. अमळनेर न्यायालयात एकूण ४२ साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यात एकूण ३८ साक्षीदार फितूर झाले होते.
मात्र न्या. सी. व्ही. पाटील यांनी फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक शरद घुगे, डॉ योगेश पवार, तपासी अधिकारी प्रकाश हाके, जबाब घेणारे तत्कालीन नायब तहसीलदार लालचंद नगराळे यांची साक्ष ग्राह्य धरून फॅक्टरी मालक आरोपी गोविंद एकनाथ शिरोळे, चंद्रकांत एकनाथ शिरोळे, मनीषा चंद्रकांत शिरोळे या तिघांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३०४(२) प्रमाणे दहा वर्षांचा कारावास तर स्फोटक कायदा कलम ९(ब) प्रमाणे २ वर्षांचा कारावास अशी शिक्षा आणि अनुक्रमे १० हजार व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली असून दोन्ही शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत.(केसीएन)उर्वरित सहा आरोपींपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर ५ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. सरकार पक्षातर्फे सुरुवातीला ऍड. मयूर अफूवाले, नंतर ऍड राजेंद्र चौधरी यांनी काम पाहिले.