जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिस च्या गुंतागुंतीची अवघड शस्त्रक्रिया गुरुवार १० जुन रोजी पार पडली. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाचा जीव वाचविण्यात वैद्यकीय पथकाला साडे चार तासांनंतर यश आले.
पारोळा येथील ५० वर्षीय इसमाला म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे दिसून येत होती. त्याच वेळी त्याला जेवण करण्यास अडचणी येत होत्या. अशा परिस्थितीत त्याला ३१ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी सी २ या कक्षात दाखल करण्यात आले.
म्युकोरमायकोसिसचे निदान करण्यासाठी वैद्यकीय पथकाने सूक्ष्मजीवशास्त्र विभागात नमुने पाठविले. तेथे अत्याधुनिक मायक्रोस्कोपीद्वारे विभाग प्रमुख डॉ. किशोर इंगोले यांनी रोगाचे निदान केले. त्यानंतर आजाराची तीव्रता वाढत असल्याने त्यांना औषधवैद्यक शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय गायकवाड, डॉ.आस्था गणेरीवाल यांच्या निगराणीखाली कक्ष क्रमांक सी २ मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र शस्त्रक्रियेची गरज होती. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, म्युकोरमायकोसिस कृती दलाचे अध्यक्ष तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळी ९.३० वाजता या रुग्णाची शस्त्रक्रिया सुरु झाली. सुमारे साडेचार तासानंतर रुग्णास वाचविण्यास यश आले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी शस्त्रक्रियेनंतर भेट देऊन वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.
म्युकोरमायकोसिसच्या या शस्त्रक्रियेत या रुग्णाच्या वरचा दोन्ही बाजूच्या जबडा, टाळू आणी वरचे दातांवर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. डोळा व मेंदूकडे पसरण्याआधीच हि शस्त्रक्रिया वेळेत झाली. त्यामुळे दोन्ही अवयव वाचले. रुग्णास द्रवपदार्थद्वारे जेवणासाठी पोटाला छिद्र पाडून नळी टाकून व्यवस्था करण्यात आली. शस्त्रक्रियेत कान नाक घसा विभागाचे डॉ. अक्षय सरोदे, दंतशल्यचिकित्सा विभागाचे डॉ. इम्रान पठाण, डॉ. श्रुती शंखपाळ, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. उमेश जाधव, बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. संदीप पटेल, डॉ. स्वाथी एम., डॉ. काजल साळुंखे यांच्यासह शस्त्रक्रिया विभागातील नर्सिंग प्रमुख निलिमा जोशी, नजमा शेख, निशा गाढे, दिलीप गिरंगे, जयश्री माळी, आश्र्विनी देशमुख, सहायक जितेंद्र साबळे, जतीन चांगरे, किशोर चांगरे, विवेक मराठे, विजय बागुल, गायत्री तायडे आदींनी सहभाग घेतला.