भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांची कारवाई
भुसावळ (प्रतिनिधी) :- भुसावळातील रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिसांनी संयुक्त कारवाई करून बीड जिल्ह्यातील परळी येथील ३१ वर्षीय तरुणाला ९ जिवंत काडतूस व गावठी पिस्टलासह अटक केली. ही कारवाई रविवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आली.
प्रकाश आकाश मुंडे (वय ३१) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. संशयीताविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भुसावळ रेल्वे स्थानकावरील साऊथ बाजूकडील मुसाफिर खान्यात असलेल्या लगेज स्कॅनर मशीनमध्ये रविवारी सायंकाळी ६ वाजता संशयीताची बॅग तपासणी केल्यानंतर यंत्रणेला सिग्नल मिळताच संशयीताला ताब्यात घेण्यात आले.
पंचांसमक्ष बॅगची तपासणी केली असता त्यात १ गावठी पिस्तूल व ९ जिवंत काडतुसे आढळली.
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना व लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. रात्री उशिरा संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताकडे पुणे प्रवासाचे जनरल तिकीट आढळले असून पोलिसांकडून याबाबत माहिती घेतली जात आहे.