आरोपीना फाशी देण्याची मागणी, जनभावना तीव्र
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील स्नेहलता चुंबळे या सेवानिवृत्त परिचारिकाच्या खूनप्रकरणी जिल्हा परिषद येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी निषेध मोर्चा काढला. मोर्चात हजारोंच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी आरोपीना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली.
मोर्चा राज्य कास्ट्राईब कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, राज्य बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी संघटना, बहुजन कर्मचारी संघटना, हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना, फार्मसी ऑफिसर असोसिएशन, जिल्हा परिषद मागासवर्गीय व इतर मागास वर्गीय संघटना यांच्या तर्फे काढण्यात आला. निवेदन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, प्रभारी निवासी उप जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, स्नेहलता अनंत चुंबळे, सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यिका, प्रा.आ. केंद्र साळवा, ता.धरणगांव यांचे खुन करणा-या दोघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करुन खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि दोघांना फाशीची शिक्षा व्हावी. आरोपी जिजाबराव अभिमन्यु पाटील, कनिष्ठ सहाय्यक प्रा.आ. केंद्र साळवा ता धरणगांव व विजय रंगराव निकम, कनिष्ठ सहाय्यक, बांधकाम विभाग पंचायत समिती, अमळनेर यांनी सेवा कालावधीमध्ये केलेल्या गैरव्यवहाराप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, आरोपी जिजाबराव पाटील व विजय निकम यांच्या संपत्तीची सखोल चौकशी करावी, जिल्हा परिषद आरोग्य विभागात महिला तक्रार निवारण समिती स्थापन व्हावी अशी मागणी करण्यात आली.