जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कक्ष क्रमांक १२ येथे एका परिचारिकेला विनयभंग करून दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवार दि. १२ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे जिल्हाभरातील रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. या ठिकाणी कक्ष क्रमांक १२ येथे संजय अनिल भोई (रा. एरंडोल) याचा अपघात झाल्याने तो कक्षामध्ये उपचार घेत आहे. सोमवार दि. १२ मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फिर्यादी परिचारिका ह्या कर्तव्यावर असताना संशयित आरोपी गोलू वंजारी (रा. एरंडोल) याने परिचारिकेजवळ येऊन, त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत जाब विचारला असता गोलू वंजारी यानी, तुला काय करायचे ते कर असे म्हणत दमदाटी केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकाने त्याला बोलण्यास गेले असता सुरक्षारक्षकाला देखील दमदाटी करून धक्काबुक्की करीत संशयित आरोपी गोलू वंजारी तिथून निघून गेला. याबाबतची फिर्याद जिल्हापेठ पोलीस स्टेशनला परिचारिकेने दाखल केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख करीत आहेत.