जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आंदोलनकर्त्यांचा आक्रमक पवित्रा
जळगाव (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे शनिवारी दिनांक १९ जुलै रोजी परिचर्या संवर्गातील सर्व स्त्री-पुरुष कर्मचारी बेमुदत संपावर उतरले या संपाचा परिणाम पहिल्याच दिवशी पाहायला मिळाला. दरम्यान संप रविवारी देखील सुरूच राहणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
सातव्या वेतन आयोगातील त्रुटी आणि कंत्राटी पदभरती विरोध या प्रमुख मागण्यासाठी परिचारिका संघटनेने गेल्या दोन आठवड्यांपासून संघर्ष उभा केला आहे. मुंबईमध्ये दोन दिवस धरणे आंदोलन झाल्यानंतर एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारल्यावरही शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे आता शनिवार दि. १९ जुलै पासून बेमुदत संपावर परिचारिका व परिचारक हे उतरले आहेत. शनिवारी एकूण ३१६ सिस्टर व ब्रदर बेमुदत संपावर गेले. त्यांचा कार्यभार परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांभाळला. मात्र अनुभवाची कमतरता कुठेतरी पहिल्याच दिवशी या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आली.
दरम्यान शनिवारी बेमुदत संपावर गेल्यानंतरही शासनाकडून कुठल्याही प्रकारची चर्चा या संघटनेसोबत झालेली नसल्यामुळे रविवारी देखील नियमितपणे बेमुदत संप सुरू राहणार असल्याची माहिती जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शाखेचे अध्यक्ष रूपाली पाटील, कार्याध्यक्ष नीता दुसाने, सचिव राजेश्वरी कोळी, खजिनदार अक्षय सपकाळे यांनी दिली आहे.