मुंबई ( प्रतिनिधी ) – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीयाने गृहमंत्रालयातील गोपनीय फाईल चोरल्याचा संशय आहे. निकटवर्तीय संजय पुनामियांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संजय पुनामिया यांच्या मोबाईलमध्ये ही फाईल आढळून आली.
परमबीर सिंह यांना गुन्ह्यात मदत करण्याच्या हेतून फाईल चोरल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे हे फाईल चोरी प्रकरण परमबीर सिंह यांच्या अडचणी आणखी वाढवताना दिसून येतंय.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यांची चौकशी सध्या सुरू आहे. फरार असलेले परमबीर सिंह बऱ्याच दिवसांनी मुंबई दाखल होऊन चौकशीला सामोरे जात आहेत. त्याच्यावर खंडणी, धमकावणे, जातीवाचक शिविगाळ असे आरोप झाले असून त्यांच्यावर मुंबई आणि ठाण्यात 5 गुन्हे दाखल आहेत. चौकशीचा ससेमिरा परमबीर सिंह यांच्या मागे लागला आहे.
परमबीर सिंह यांनी आज ठाणे पोलिसांत हजेरी लावली. ठाणे कोर्टानं त्यांना तुर्तास दिलासा दिला आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधातील नॉनबेलेबल अटक वॉरंट कोर्टानं 15 हजारांच्या बॉन्डवर रद्द केलं आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोर्टानं परमबीर सिंह यांना चौकशीत सहकार्य करण्याचेही आदेश दिले आहेत. कुठेही जेव्हा चौकशीला बोलावतील तेव्हा परमबीर सिंह कोर्टात हजेरी लावतील अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिलीय. परमबीर सिंह यांची प्रकृती ठिक नसल्यानं ते इतके दिवस चौकशीला गैैरहजर राहिल्याचं त्यांचे वकील राजेंंद्र मोकाशी यांनी दिली.