मुंबई ( प्रतिनिधी ) – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि सध्या फरार घोषित परमबीर सिंह भारतातच असल्याचं समोर आलंय. स्वतः परमबीर सिंह यांच्या वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली पोलिसांकडून जीवाला धोका असल्याने परमबीर सिंह समोर येत नाहीत.
कोणत्याही सीबीआय किंवा इतर कोर्टात हजर राहण्यास तयार असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केलाय. परमबीर सिंह यांच्या वकिलाने केलेल्या युक्तिवादानंतर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना अंतरिम संरक्षण दिलंय. आधी न्यायालयाने परमबीर सिंह कुठं आहेत हे समजल्याशिवाय अंतरिम सुरक्षा देण्यास नकार दिला होता.
मुंबई कोर्टाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या अर्जाला परवानगी दिली आहे. परमबीर सिंग व भाटी आणि विनय सिंग यांना फरार घोषित करण्यात आलंय.
परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आल्यानंतर त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत परमबीर सिंग न्यायायलयासमोर हजर झाले नाही तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.
मुंबईच्या किल्ला कोर्टाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं आहे. गोरेगावच्या प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक समन्स काढले होते, मात्र त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर झाले नव्हते. आता न्यायालयाने परमबीर सिंग यांच्यासह भाटी आणि विनय सिंग यांना देखील फरार घोषित केलं आहे.