चोपडा पाणीपुरवठा योजना व जलशुध्दीकरण केंद्राचे उद्घाटन
जळगाव ( प्रतिनिधी ) – कोविडमुळे राज्य शासनाच्या उत्पन्नात घट झाली असूनही नागरिकांच्या आरोग्यासह जीवनमान उंचावण्यासाठी असलेल्या योजनांना शासन प्राधान्याने निधी उपलब्ध करून देत आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी केले.
चोपडा नगरपरिषदेच्या नूतन पाणीपुरवठा (अंदाजपत्रकीय रक्कम 64.76 कोटी रुपये) योजनेंतर्गत जलशुध्दीकरण केंद्र व जलकुंभाचा उद्घाटन सोहळा गृहमंत्री वळसे- पाटील यांच्या हस्ते आज पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार अनिल पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजीमंत्री एकनाथराव खडसे, उपनगराध्यक्ष भूपेंद्र गुजराथी, माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, कैलास पाटील, मनीष जैन, रविंद्र पाटील, संदिप पाटील आदी उपस्थित होते.
गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, वाढत्या लोकसंख्येबरोबर पोलिस दलाची कामेही वाढली आहेत.चोपडा आणि अडावद पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांच्या घरकुलांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पोलिस ठाण्यात नागरिकाला आदराची वागणूक देऊन तक्रार सोडविण्याचे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिलेत.
पालकमंत्री पाटील म्हणाले, जलजीवन मिशनच्या माध्यमातून राज्यातील 27 हजार गावांमध्ये 15 हजार कोटी रुपये खर्चाचा पाणीपुरवठ्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील 828 गावांसाठी 926 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. चोपडा शहरासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून 26 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला अडावदकरीता 28 कोटी रुपयांचा, धानोरा गावासाठी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील पोलीस दलासाठी 36 चारचाकी तर 30 दुचाकी वाहने देण्यात आली आहेत. पाळधी येथे पोलीस स्टेशन निर्मितीची मागणीही त्यांनी केली.
यावेळी अरूण गुजराथी यांनी चोपडा शहराकरीता भूमिगत गटार योजनेला मंजूरी मिळण्याची मागणी केली. जीवन चौधरी यांनी नगरपालिकेमार्फत पूर्ण केलेल्या, सुरू असलेल्या व यापुढे करण्यात येणा-या कामांची माहिती प्रास्ताविकात दिली.