आढावा बैठकीत महावितरण, पाणीपुरवठा विभागाला सूचना
जळगाव (प्रतिनिधी) : महावितरण आणि पाणी पुरवठा विभागांनी समन्वय ठेवून तात्काळ पाणीपुरवठा योजनांच्या वीज जोडणीची तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
जिल्हा नियोजन भवनमध्ये महावितरण आणि पाणी पुरवठा विभागाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, महावितरणचे अधिक्षक अभियंता अनिल महाजन, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता भोगावडे, मजीप्राचे निकम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. महावितरण विभागाला गेल्या पाच वर्षांत १ हजार ५२० ट्रान्सफार्मर आणि अनुषंगिक कामांसाठी १११.४१ कोटींचा निधी वितरित केला आहे. मात्र, वाढत्या मागणीमुळे अधिक ट्रान्सफार्मर बसविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या निधीतून तालुकानिहाय कामे मंजूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या ४६२ पाणीपुरवठा योजना वीज जोडणीअभावी अद्याप अपूर्ण आहेत. यातील २८१ योजनांचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून सादर करावे, असे आदेश पालकमंत्री यांनी दिले. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ११ ठिकाणी पाण्याचे स्रोत आणि १८ ठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यकारी अभियंता भोगवाडे यांनी १०० दिवस अभियानांतर्गत घरगुती नळ जोडणी १००% पूर्ण करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देऊन तसेच पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महावितरण अधिक्षक अभियंता यांनी समन्वय साधून वीज जोडणीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत असे निर्देश दिले.
सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यास गती
मेडा विभागाने मंजूर केलेल्या २५ सौर प्रकल्पांपैकी १८ प्रकल्प भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले असले तरी, संबंधित शासकीय कार्यालयांनी वीज बिल न भरल्यामुळे नेट मीटरिंग प्रक्रियेत अडथळा आला आहे. त्यामुळे बिहाइंड द मीटर प्रणाली लावून हे प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महावितरण, मेढा आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वय साधून दि. २० मार्चपर्यंत ही कामे पूर्ण करावीत, असे आदेश देण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरण आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्वय ठेवून वीज जोडणीच्या प्रक्रियेला वेग द्यावा असे आदेश दिले. जिल्ह्यातील जलस्रोतांचा योग्य वापर करून, सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करून आणि तांत्रिक अडथळे दूर करून नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.