जळगावात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या दिनांक २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ६ ते १० या वेळेत वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृह, जिल्हा पेठ, जळगाव या ठिकाणी पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात दिनांक २ फेब्रुवारी रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक गायक चैतन्य परब, ख्यातनाम गायिका अमृता काळे, विख्यात सारंगीवादक साबीर खान, ज्येष्ठ गायक पंडित हरीश तिवारी यांचे सादरीकरण होणार आहे तर ३ फेब्रुवारी रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक ऋतुराज धुपकर व कृष्णा साळुंखे, प्रसिध्द गायक अनुरत्न रॉय, बासरीवादक चिंतन कट्टी व ज्येष्ठ गायक धनंजय जोशी यांचे सादरीकरण होणार आहे.
मंगळवारी ४ फेब्रुवारी रोजी पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत शिष्यवृत्तीधारक वादक जगन्मित्र लिंगाडे व यश खडके यांची जुगलबंदी, प्रसिध्द गायिका रौकिंणी गुप्ता यांचे गायन होणार आहे तर पद्मश्री पंडित रोणू मुजुमदार व ऋषिकेश मुजुमदार यांची बासरी जुगलबंदी व ज्येष्ठ गायक पंडित आनंद भाटे यांचे गायन असे नामवंत भारुड कार आपली शास्त्रीय संगीत गायन व वादन कला सादर करणार आहेत.
या कार्यक्रमास वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान यांनी सहकार्य केले आहे. रसिक प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या सुरेल कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.