पाळधी ( प्रतिनिधी ) – येथील प्रसिद्ध उद्योगपती कासट ग्रुप यांचे कार्यालयातील कॅबिन मधील २ लाख ६० हजाराची रक्कम रात्री चोरट्यांनी घेवून पोबारा केला. या वेळी त्यांना मज्जाव केला असता त्यांनी दगड फेक केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
येथील प्रसिद्ध उद्योगपती कासट ग्रुपचे संचालक अशोक व शरद कासट यांचे महामार्गालगत घर असून घराच्या आवारात त्यांचे व्यावसायिक कार्यालय आहे. ते विटभट्टीच्या व्यवसाया बरोबरच सरकारी कंत्राटदार आहेत. रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कार्यालयातील खिडकीचे ग्रिल तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला व कॅबिनमध्ये जावून ड्रॉवरमधील पैसे काढून चोरट्यांनी पोबारा केला. यात शरद कासट यांचे ४० हजार, शैलेश कासट यांचे १ लाख, आशिष कासट यांचे ७० हजार, अमर कासट ५० हजार असा एकूण दोन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
या वेळी घराच्या गेट जवळ असलेल्या रखवालदार याला चाहूल लागली असता त्यांनी चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यावर दगड फेक केली. त्याने आरडा ओरड करताच घरातील सर्व जण जागे झाले. मात्र चोरटे पसार झाले. याप्रकरणी अनिल अशोक कासट यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल उमेश भालेराव करीत आहे.