पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात चोऱ्यांचे प्रमाण वाढले, एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी
धरणगाव शहरातील पारधी वाड्यातील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) – शहरातील पारधी वाड्यात एका दिवसात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून रोख रक्कम व दागिन्यांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी ३० ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील पारधी वाडा येथे एकाच वेळी तीन ठिकाणी घरफोडी करण्यात आली. मधुकर एकनाथ दाभाडे रा. पारधी वाडा, धरणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुधवारी ३० ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात दोन ते तीन जण घरात घुसले, लोखंडी कपाटातील २० हजार रूपयांची रोकड, चांदीचे ब्रेसलेट असा मुद्देमाल लांबविला. शिवाय याच परिसरातील इतर दोन ठिकाणी चोरी केली. परंतू चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. याप्रकरणी मधुकर दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच परिसरात अनेकवेळा चोऱ्या झाल्या असून पोलिसांची गस्त दिसून येत नसल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.