वन्यजीव प्रेमींनी आमदारांकडे दिले निवेदन
चंद्रकांत कोळी
रावेर ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील पाल येथील १४ हरिण मृत्यूप्रकरणी शासकीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या हरिण पैदास केंद्रास केंद्रीय झू अॅथोरिटीची मान्यता देत पुनर्जीवित करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे. याबाबतचे निवेदन आमदार अमोल जावळे यांना देण्यात आले आहे.
हे हरीण पैदास केंद्र ३५ ते ४० वर्षापासून सुरू आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून या केंद्रातील प्राण्यांची देखभाल चांगली होत नसल्याचे दिसून येते. दुसरीकडे लाखों रुपये खर्चुन काही दिवसांपूर्वी जंगल सफारी उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, हरिण पैदास केंद्राच्या देखभालीसाठी पैसा नाही. याच हरिण पैदास केंद्राला झू अॅथोरिटीची परवानगी मिळाल्यास केंद्र सरकारकडूनही या केंद्राला निधी मिळू शकला असता. मात्र, त्यासाठी वन विभागाला काही अटी पूर्ण करण्यास सांगितल्या होत्या, यासही अनेक वर्षे झाली. कुठलीही उपायोजना त्यावर करण्यात आली नाही. नेहमी दुर्लक्ष होत राहिले. आणि आता ही घटना घडली. याबाबतचे निवेदन खिर्डी येथील वन्यजीवप्रेमी संकेत पाटील, अंकित पाटील, भागवत महाजन, यज्ञेश भंगाळे यांनी दिले. हरणाच्या मृत्यू प्रकरणी आमदार जावळे विधी मंडळात आवाज उठविणार आहेत. याच बरोबर कडक कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.