इस्लामाबाद ( वृत्तसंस्था ) – पाकिस्तान मध्ये रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. सिंध मध्ये दोन रेल्वेची समोरा-समोर टक्कर होऊन अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सर सय्यद एक्सप्रेस व मिल्लत एक्स्प्रेस या दोन गाड्यांची टक्कर झाली असून यामध्ये ३० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
पाकिस्तानच्या घोटकी येथील रेती आणि दहारकी रेल्वे स्थानकांदरम्यान मिल्लत एक्स्प्रेस व सर सय्यद एक्स्प्रेस या दोन गाड्यांची समोरा-समोर धडक झाल्याने हा अपघात घडला आहे. यामध्ये जवळपास ३० जणांचा मृत्यू झाला आहे. आज सकाळी ही घटना घडली आहे. लाहोरच्या दिशेने जाणारी सर सय्यद एक्स्प्रेस गाडी कराचीहून सरगोधाकडे जाण्यासाठी निघाली असताना मिल्लत एक्स्प्रेसला धकड बसून हा अपघात झाला आहे.
येथील रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १३ ते १४ बोगी रुळावरून घसरल्या आहेत. यामध्ये अनेक प्रवासी अद्याप अडकले असून बचाव कार्य चालू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.