मुक्ताईनगर शहरात महाराष्ट्र ग्रामीण बँकेबाहेर घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बाहेर एका भामट्याने प्रौढाला दिशाभूल करून भर दिवसा ३ लाख २५ हजार रुपये असलेली थैली पळविल्याची घटना गुरुवारी दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता घडली. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निमखेडी खुर्द येथील रहिवासी रतन कडू घोडकी हे शेती व्यवसाय व प्लंबर काम करून उदरनिर्वाह चालवितात. आज दि. १२ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे संत ज्ञानेश्वर पतसंस्था व महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे प्लॉट खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम काढण्यासाठी आले होते.(केसीएन)पहिल्यांदा त्यांनी संत ज्ञानेश्वर पतसंस्था येथून २ लाख २५ हजार रोख दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी काढून नंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा मुक्ताईनगर येथून दुपारी १ वाजेच्या सुमारास १ लाख रुपये असे एकूण ३ लाख २५ हजार रुपये रोख जवळच्या कापडी पिशवीत ठेवून निघाले.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बाहेर आल्यावर ते घरी जाण्यासाठी निघाले असताना बँकेच्या बाहेर गेटवर एका अनोळखी इसमाने “तुझे खिशातील पैसे खाली पडले” असे सांगून खाली पडलेले पैसे दाखवले. रतन घोडकी यांनी मोटरसायकल थांबवून पैशांचे पिशवी गाडीच्या हॅन्डलला लावून खाली पडलेले पैसे उचलण्यासाठी वाहनाचे खाली उतरून पैसे उचलण्यासाठी मागे गेले.(केसीएन)खाली पडलेले पैसे उचलून दुचाकीकडे गेले असता आजूबाजूला उभे असलेल्या लोकांनी रतन यांना समोर जाणारी मोटर सायकलवरील चालक यांनी तुझ्या मोटर सायकलच्या हॅन्डलची पिशवी काढून पळून जात आहे, असे सांगितले. म्हणून त्यांनी मोटरसायकलचा पाठलाग करण्यासाठी मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुलीपर्यंत गेले. मात्र कोणी दिसून आले नाही. म्हणून अनोळखी चोरट्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.