जळगावात मु.जे. महाविद्यालयाच्या प्रशासनावर नातेवाईकांचा गंभीर आरोप
जळगाव ( प्रतिनिधी ) – कामाच्या ठिकाणी सतत त्रास देण्यासह कामावरून काढून टाकल्याच्या तणावात असलेल्या इसमाने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
महेश भास्करराव सावदेकर (५२, रा. देविदास कॉलनी) असे मयत इसमाचे नाव आहे. कामाच्या ठिकाणी कायम करण्यासाठी जवळपास १५ लाख रुपये देऊनही पुन्हा महाविद्यालयात येऊ नको, असे सांगून काढून देण्यात आल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश सावदेकर हे मू.जे. महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कामाला होते. सोमवारी दुपारी त्यांच्या पत्नी यशोधरा सावदेकर या कामावर तर मुलगा क्लासला गेलेला असताना महेश हे घरी एकटेच होते. त्यावेळी त्यांनी विषारी द्रव सेवन केले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारील मंडळींना ते जमीनीवर पडलेले व तोंडातून फेस येत असल्याच्या अवस्थेत दिसले. त्या वेळी त्यांनी त्यांच्या पत्नी तसेच भाऊ अविनाश सावदेकर यांना कॉल करून माहिती दिली.
ते तत्काळ घरी पोहचले व सावदेकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. महेश सावदेकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यशोधरा यांनी सांगितले की, ते अनेक वर्षांपासून मू.जे. महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने कामाला होते. त्या ठिकाणी त्यांना कोणतेही काम करण्यास सांगितले जात होते व ते मिळेल ते काम करीतही होते. या बदल्यात जास्त पगार दाखविला जायचा व तशी सहीदेखील घेतली जात असे, मात्र हाती तोकडी रक्कम दिली जात होती. त्यात कामाच्या ठिकाणी कायम करण्यासाठी संस्थेला जवळपास १५ लाख रुपये दिले. यासाठी दिलीप रामू पाटील यांनी मध्यस्थी केली होती, असा आरोप मयताच्या पत्नीने केला.
कामावर कायम तर केलेच नाही शिवाय दीड महिन्यांपूर्वी काढून टाकले. त्यानंतर ते वारंवार महाविद्यालयात भेटण्यासाठी गेले, मात्र तेथे त्यांना कामाविषयी उडवाउडवीचे उत्तर दिले जात असे. ‘मला कामावरून काढून टाकले, त्यांच्या हातापाया पडलो तरी कामावर घेतले नाही, यापुढे महाविद्यालयात यायचे नाही’ असे सांगून काढून टाकल्याचे ते सतत सांगत असायचे, यातून ते तणावात गेले व त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप यशोधरा सावदेकर यांनी केला आहे. पतीच्या आत्महत्येस जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









