पहूर ते हिवरखेडा दरम्यान घटना

फिर्यादी तरुणी (वय २०, रा. नेरी दिगर, ता. जामनेर) ही बी.कॉमच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० ते ११:३० च्या दरम्यान, संशयित आरोपी श्रीकृष्ण देवचंद जाधव (रा. चारुतांडा, ता. सोयगाव) याने पीडितेशी बोलायचे असल्याचे सांगून तिला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवले. आरोपीने तिला पहूर ते हिवरखेडा रस्त्यावरील एका निर्जन केळीच्या शेतात नेले. तेथे त्याने, “तू आताच माझ्यासोबत पळून चल, आपण लग्न करू,” असा तगादा लावला. मात्र, पीडितेने लग्नास स्पष्ट नकार दिला.
लग्नाला नकार दिल्याने संतापलेल्या आरोपीने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली. “तू माझी नाही झालीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही,” असे म्हणत त्याने पीडितेचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. इतक्यावरच न थांबता, हातातील दगडाने तिच्या डोक्यावर वारंवार प्रहार करून तिला गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच पहूर पोलिसांनी तातडीने हालचाली करत गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम (पाचोरा विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी श्रीकृष्ण जाधव याला पोलिसांनी २१ फेब्रुवारी रोजी रात्री १०:४४ वाजता अटक केली आहे.








