पहूर, ता. जामनेर (प्रतिनिधी) – येथील ख्वाजानगरातील भाजप अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष शेख सलीम शेख गनी यांच्या बंद घरातून तब्बल १५ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पहूर येथील ख्वाजानगर भागात रहाणारे भाजपा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शे. सलीम शेख गनी हे गुरूवारी सकाळी ११ वाजता कुटुंबियांनसह जळगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यांनी अलीकडेच प्लॉटचा व्यवहार केल्याने पंधरा लाखांची रक्कम घरात होती. ते जळगाव येथे मुक्कामी होते. त्यांनी आपले, लहान बंधू सद्दाम शेख गनी यांना सांगितले की घराकडे चक्कर मारून ये. त्यानुसार त्यांनी रात्री १२ ते १२.१५ वाजेच्या दरम्यान पाहणी करून घर सुरक्षित असल्याचे सांगितले. व त्यानंतर शे. सद्दाम, शे. रईस, शे. रफीक हे तिघेही कार्याक्रमासाठी जळगाव येथे गेले.दरम्यान शे. सलीम शेख गणी हे कुटुंबियांसह शुक्रवारी सायंकाळी घरी पोहचले असता त्यांना घराचा किचनचा दरवाजा उघडा दिसला. आत प्रवेश केला असता कपाटाकडे गेल्यावर त्यातील असलेले पंधरा लाखांची रोकड न दिसल्याने त्यांना हादरा बसला.
याची माहिती मिळताच घटनास्थळी पहूर पोलीस स्टेशनचे पी. एस. आय. किरण बर्गे, पी. एस. आय. अमोल देवडे, पी. एस. आय. चेडे, शशिकांत पाटील दाखल झाले. व त्यानंतर अवघ्या तासाभरात पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नीता कायते यांनी घटनास्थळी पाहणी करून चौकशी केली.
दरम्यान या घरफोडी ने परिसरातील रहिवासी भयभीत झाले असून, या अगोदर झालेल्या अनेक चोर्यांचा तपास न लागल्याने व आज रोजी झालेल्या घरफोडीचा तपास जलद गतीने व्यक्त व्हावा अशी अपेक्षा जनतेची आहे. पहूर पोलीसांना या अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडी चा तपास एक आव्हान आहे. दरम्यान रात्री उशीरा श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान शेख. सलीम शेख गनी यांनी पहूर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यां विरूध्द भाग ५ गु.र.नं.२५८/२०२० भादंवि कलम ४५४,४५७,३८,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अमोल देवडे हे करीत आहेत.
या प्रकरणी प्राथमिक चौकशी वरून जवळ्च्या व्यक्ती ने रोकड लंपास केली असावी यांच्या तपास कामी पथके नियुक्त करण्यात आली आहे. श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे यांनी दिली आहे.