आ. मंगेश चव्हाण यांचे लाभले सहकार्य
चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील १४ पर्यटक जम्मू-काश्मीर येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान, पहलगाम येथे असताना अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला चढविला. मात्र या हल्ल्याच्या घटनेपासून चाळीसगावकर थोडक्यात बचावले आहे. त्यांना परत आणण्यासाठी आ. मंगेश चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले असून आता हे १४ पर्यटक आज सकाळी जम्मू काश्मीर येथून दिल्ली येथे पोहोचले आहेत.
चाळीसगाव तालुक्यातील १४ पर्यटक जम्मू आणि काश्मीर मध्ये अडकले होते. देशमुख यात्रा कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते. त्यात भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा देवयानीताई ठाकरे यांचा देखील समावेश होता. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्याच ठिकाणी आदल्या दिवशी चाळीसगाव तालुक्यातील पर्यटक भेट देऊन आले होते. सुदैवाने आता सर्व १४ पर्यटक सुखरूप असून आ. मंगेश चव्हाण यांनी फोनवरून त्यांची चौकशी करत संवाद साधला होता.(केएसएन)या अडचणीच्या वेळी पूर्ण देशाच्या संवेदना आपल्या सोबत असून अडकलेल्या सर्व पर्यटकांना येत्या १ ते २ दिवसात सुखरूपपणे घरी पोहचविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. आता चाळीसगाव सहजयोग परीवारातील सर्व १४ सदस्य आज सकाळी १२ वाजता विमानाने श्रीनगरहून दिल्लीकडे रवाना होऊन दिल्लीला सर्व सुखरूप पोहचले. दोन दिवस दिल्ली येथील माताजी निर्मलादेवी यांच्या श्री निर्मलधाम आश्रम येथे थांबून २७ तारखेला सर्व सदस्य राजधानी एक्सप्रेसने दिल्लीहून जळगावला येतील, अशी माहिती आ. मंगेश चव्हाण यांनी दिली.