अमळनेर तालुक्यात खर्दे शिवारात घडली घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील खर्दे शिवारातील एका शेतात विहिरीत पाडसे गावातील ७५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने सोमवारी दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजताच्या सुमारास खळबळ उडाली. दुपारी १२ वाजता मारवड पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पंढरीनाथ डिगंबर पाटील (वय ७५, रा. पाडसे, ता. अमळनेर) असे मृत वृद्धाचे नाव आहे. पंढरीनाथ पाटील हे पाडसे गावात आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. रविवार, ३ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरात ‘रोट’चा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते ‘बाहेर जाऊन येतो’ असे सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी, सोमवार ४ ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांचा शोध सुरू करण्यात आला. खर्दे शिवारातील एका शेतातील विहिरीपाशी त्यांची चप्पल आणि काठी आढळून आली.
नातेवाईकांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना पंढरीनाथ पाटील यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. गावातील काही ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला आणि अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. पंढरीनाथ पाटील हे विहिरीत नेमके कसे पडले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या घटनेमुळे पाडसे गावावर शोककळा पसरली आहे. मारवड पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुकेश साळुंखे हे करीत आहेत.