नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- देशाचे ख्यातनाम विशेष सरकारी वकील, पद्मश्री सन्मानित आणि अलीकडेच राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेले अॅड. उज्ज्वल निकम यांचा जळगाव शहरात भव्य नागरी सत्कार छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे आयोजित करण्यात येत आहे. याबाबत आयोजनासंदर्भात जैन इरिगेशनचे अध्यक्ष तथा नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या सत्काराचे आयोजन भव्य स्वरूपात व्हावे यासाठी जळगाव शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश असलेली “नागरी सत्कार आयोजन समिती” स्थापन करण्यात आली असून, अध्यक्षपदी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांची सर्वानुमतीने निवड करण्यात आली आहे.
या आयोजनाचे स्वरूप व इतर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
अॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर एक माहितीपट देखील तयार करण्यात आला आहे. तो कार्यक्रमावेळी दाखविला जाईल. नागरी सत्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. एन. के. ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, आ. राजूमामा भोळे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला राज्य पणन महासंघाचे पदाधिकारी रोहित निकम, शंभू पाटील, जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील, ऍड. सुशील अत्रे, राम पवार, एजाज मलिक, पांडुरंग काळे, संगीता पाटील, अशोक लाडवंजारी आदी उपस्थित होते.