पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई (प्रतिनिधी) :- पाणीपुरवठा विभागातील प्रगतीपथावरील कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत ग्रामीण भागातील जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भातील कामांना गती देणार असल्याचे पुन्हा एकदा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी आज सांगितले आहे. शपथविधीनंतर आज मंत्रालयातील दालनात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा पदभार मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वीकारला आहे.
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, या विभागाच्या योजना यापूर्वीही प्रभावीपणे राबविण्यात आल्या असून प्रगतीपथावरील योजनांसाठी आवश्यक निधी वितरित करण्यात येईल. पाण्याची कमतरता भासू नये यासाठी तांत्रिक बाबींचा आढावा घेऊन विविध कामांना गती देणार आहे. विभागाच्या माध्यमातून पाण्याची मूलभूत गरज पूर्ण करणे ही शासनाची प्राथमिकता असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.