जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासन माध्यमिक मधून प्राथमिकमध्ये इयत्ता ५ वीला वर्ग करीत आहे. इयत्ता ५ वीचा वर्ग माध्यमिक विभागापासून तोडल्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार असल्याची भीती भाजपच्या शिक्षक आघाडीतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
इयत्ता ५ वीच्या शिक्षकांची नियुक्ती हि महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्याशर्ती) विनियम अधिनियम १९७७ व नियमावली १९८१ च्या कायद्यान्वये माध्यमिक शिक्षक म्हणून करण्यात आली आहे. सदर शिक्षकांना प्राथमिक विभागात समायोजित करणे घटना बाह्य आहे. जर संबंधित संस्थेत प्राथमिक विभाग नसेल तर त्या शिक्षकांना अन्यत्र समायोजित करावे लागेल. पर्यायाने त्यांची सेवाजेष्ठ्ता संपुष्टात येईल. आधीच सेवाजेष्ठतेत त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यात अजून संपवायचा हा डाव दिसतोय. म्हणून सदर निर्णय त्वरित मागे द्यावा. अशी मागणी भा.ज.पा.शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, व शिक्षण सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नुकतेच सहसचिवांच्या १६ सप्टेंबरच्या पत्राने राज्यभरात खळबळ उडाली आहे. राज्यातील माध्यमिक शाळांतील ५ वी चे वर्ग प्राथमिक शाळांना जोडणार म्हणजे माध्यमिक शाळांतील वर्ग खाली पडणार, व प्राथमिक शाळांना त्या भौतिक सुविधा तितक्याश्या नसल्यामुळे वर्ग, खोल्या, संगणक कक्ष पासून तत्सम गरजांची कमतरता जाणवणार. मग पुन्हा त्या संस्थांवर आर्थिक बोजा वाढणार. लगेच येत्या एकदोन वर्षात नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल होणार आहेच. मग शासनाला इतकी काय घाई झाली, असा सवाल शिक्षक आघाडीने विचारला आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील हजारोच्या संख्येने ५ वीचे माध्यमिक शाळांतील शिक्षक अतिरिक्त निघतील. असे होऊ नये म्हणून त्वरित सदर पत्र मागे घ्यावे ह्या आशयाचे प्रसिद्धीपत्रक भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रवीण जाधव यांच्यासह प्रवीण धनगर, आर.एन.निळे, संदीप घुगे, ए.बी.पाटील, संजय वानखेडे, दुष्यंत पाटील, किरण पाटील, के.एस.पाटील, परेश श्रावगी, पी.एल.हिरे, सतीश भावसार, विशांत पाटील, विजय गिरनारे यांनी दिले आहे.








