पाचोरा तालुक्यात मोहाडी येथील घटना, माय-लेकास बेदम मारहाण
पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील मोहाडी येथे एका महिलेच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून तिचा विनयभंग केल्याची आणि गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी लताबाई धारसिंग जाधव (वय ५२) या त्यांच्या मोहाडी येथील नवीन बांधलेल्या घरात मुलासह पाणी मारण्याचे काम करत होत्या. सोमवारी (दि. १२ जानेवारी) दुपारी १२:४० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी भगवान जोसिंग जाधव (रा. मोहाडी, ता. पाचोरा) याने घरात बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपीने फिर्यादी महिलेला आणि त्यांच्या मुलाला विनाकारण चापटबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने पीडित महिलेचा विनयभंग केला. झटापटीत महिलेचे कपडे फाडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
मारहाण आणि विनयभंग करत असतानाच आरोपीने पीडित महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि तिथून पळ काढला. जाताना त्याने फिर्यादीच्या सुनेलाही शिवीगाळ केली आणि माय-लेकांना जिवंत मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर पीडित महिलेने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी भगवान जोसिंग जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकारी पोहेकाँ शैलेश चव्हाण तपास करीत आहे.









