३० हजारांचा मुद्देमाल जप्त
पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात कारमध्ये चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरणाऱ्या अज्ञात चोरट्याला पाचोरा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. संशयित आरोपीकडून चोरीस गेलेले दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून, त्याला धुळे सबजेलमध्ये पाठवण्यात आले आहे.

फिर्यादी किशोर आनंदराव नरेराव (वय ३९, रा. कृष्णपुरी, पाचोरा) यांनी १८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.२५ वाजेच्या सुमारास त्यांच्या चारचाकी वाहनात पॉवर बँकेवर मोबाईल चार्जिंगसाठी लावला होता. यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांची संमती न घेता मोबाईल चोरी करून नेला होता. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित आरोपीचा माग काढला.
तपास चालू असताना संशयित आरोपी शहरात फिरताना मिळून आल्याने, त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सौरभ नाना भिल (गायकवाड) (वय २५, रा. कळमसरे, ता. पाचोरा) असे सांगितले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीने केवळ पाचोराच नव्हे, तर पहूर पोलीस ठाणे हद्दीतही अशाच प्रकारचा मोबाईल चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून एकूण ₹३० हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ज्यात दोन मोबाईलचा समावेश आहे.
पाचोरा पोलिसांनी या गुन्ह्याचे दोषारोपपत्र केवळ १२ तासांत मा. न्यायालयात सादर केले आणि आरोपीला अटक करून धुळे सबजेल येथे पाठवले आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार आणि त्यांच्या पथकाने (पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, अशोक रामचंद्र हटकर, सफौ गणेश विरभान पाटील, पोकॉ शरद मांगो पाटील, पोकॉ संदिप किसन भोई) यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी हे करीत आहेत.









