पाचोऱ्यात रविवारची संध्याकाळ रक्तरंजित
खुनाप्रकरणी पाच संशयितांना पोलिसांकडून पहाटे अटक
पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील गुंडगिरी वाढत असून सोमवारी त्याचे पर्यवसन थेट खुनात झाले आहे. दुचाकी वाहनाचा कट लागल्याचा क्षुल्लक राग मनात धरून दोन तरुणांना लाठ्या, काठ्या, फायटरने जबर मारहाण झाली. यात एका तरुणाचा चोपरने भोसकून खून करण्यात आला आहे. शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळेसमोरील मोकळ्या जागेत ही घटना घडली.
रविवारी दि. ३० जानेवारी रोजी संध्याकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत सनी रवींद्र देवकर (वय २३, रा. गाडगेबाबा नगर, पाचोरा) यांनी फिर्याद दिली आहे. शहरातील पुनगाव रोड वरील पुराणी शाळेच्या समोरील मोकळ्या जागेत दुचाकी वाहनाचा कट लागला म्हणून संशयित आरोपी लोकेश उर्फ विकी शामराव शिंदे, मयुर दिलीप पाटील, राकेश उर्फ सचिन राजेंद्र चौधरी, राहुल पाटील, चेतन उर्फ स्टोयलेश पाटील, सागर प्रकाश पाटील, अविनाश उर्फ भद्रा सुरेश पाटील, पवन पाटील सर्व रा.पाचोरा यांनी फिर्यादी सनी देवकर यास लाठ्या काठ्यांनी, लाकडी दांडक्याने, फायटरने मारहाण केली.
सोबत सनीचा मित्र भूषण नाना शेवरे (वय २३, रा. दुर्गानगर, पाचोरा) यालाही जबर मारहाण करीत चॉपरने पोटात भोसकले. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. जखमींना रुग्णालयात दाखल केले असता तिथे भूषण नाना शेवरे याला वैद्यकीय अधिकार्यांनी मृत घोषित केले. पाचोरा पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किसन नजनराव पाटील यांनी सहकाऱ्यांसह तात्काळ हालचाली करीत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तसेच जखमींची फिर्याद मिळाल्यावर सोमवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास लोकेश शिंदे, मयुर पाटील, राकेश चौधरी, सागर पाटील, अविनाश पाटील यांना अटक केली आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात खुनाच्या गुन्ह्यासह गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोर्यातील गुंडगिरीने आता डोके वर काढल्याचे चित्र दिसून येत आहे.