पाचोरा शहरात मध्यवर्ती भागातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजेंद्र प्रसाद रोडवरील चहाच्या टपरीला गॅसचा भडका उडाल्याने अचानक आग लागली. ही घटना सोमवारी दि. ७ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. गॅस सिलिंडर जोडत असताना अचानक भडका उडाल्याने ही आग लागली असून, यात एक इसम भाजला गेला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही काळ धावपळ उडाली होती.
देशमुखवाडी येथील ७० वर्षीय वृद्ध महिला दगुबाई विठ्ठल महाजन या राजेंद्र प्रसाद रोडवर चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करतात. सोमवारी चहाचे दुकान सुरु होते. त्याचवेळी त्यांनी गॅस सिलिंडर जोडण्यासाठी समोरच राहणाऱ्या दिपक चतुर्भुज शर्मा यांना बोलावले. गॅस जोडणीच्या प्रक्रियेदरम्यान अचानक गॅसचा भडका उडाल्याने टपरीला आग लागली. दगुबाई महाजन प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून दूर गेल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, दिपक शर्मा यांचा डावा हात व गाल भाजला असून, त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी हलवण्यात आले आहे. आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्परतेने मदत करत आग आटोक्यात आणली. दगुबाई यांची चहाची टपरी पूर्णतः जळून खाक झाली आहे, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ धावपळ उडाली होती.