पाचोरा शहरातील पोलिस लाईनसमोरील घटना
पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील पोलिस लाईन समोरुन भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. घटनेप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पदमा अनिल बाहेती (वय ६५ वर्ष, रा. व्ही. आय. पी. काॅलनी, पाचोरा) ह्या पती अनिल बाहेती यांचेसह १५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील पोलिस लाईन समोरील सुलाई माता प्रोव्हीजन दुकानासमोर दिवाळीचे फराळ घेण्यासाठी थांबलेल्या होत्या. अचानक दुचाकीवरून आलेल्या आणि तोंडाला मास्क लावलेल्या दोघांपैकी एकाने पद्मा बाहेती यांच्या गळ्यातील १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लांबवून पोबारा केला. त्यांनी आरडाओरडा केला असता उपयोग झाला नाही.पदमा बाहेती यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. घटनेचा पुढील तपास पो. नि. राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निकम हे करीत आहेत.