पाचोरा शहरातील संभाजी चौकात घडली घटना
पाचोरा (प्रतिनिधी) :- शहरातील संभाजी चौकात मंगळवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजता सुमारास एका तरुणाने किरकोळ कारणावरून २ तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात एका तरुणाच्या पोटात चॉपर मारून गंभीर जखमी केले आहे तर दुसऱ्याच्या मानेवर चॉपर मारण्याचा प्रयत्न करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत जखमी यश अनिल पाटील (वय २० वर्षे रा. देशमुख वाडी, पाचोरा) यांनी फिर्याद दिली आहे. पाचोरा शहरात संभाजी चौकात यश पाटील हा मयूर विनोद भोई (वय २० रा. आठवडे बाजार, पाचोरा) याच्यासोबत २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास फटाके फोडत होता. त्यावेळेला संशयित आरोपी शिव गोसावी (पूर्ण नाव गाव माहित नाही) हा दुचाकीवर तिथे आला. त्याने दुचाकीमधून चॉपर काढून मयूर भोई याच्या पोटात मारला. तसेच फिर्यादी यश पाटील यांच्या मानेवर चॉपर मारण्याचा प्रयत्न करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत यश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार हे करीत आहेत.









