राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- पाचोरा येथे एका वाहनातून ५ लाख २० हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हि कारवाई केली असून पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैध मद्य विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू आहे. यामध्ये पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी शनिवारी दि. ३० रोजी जामनेर-बोदवड रस्त्यावर अवैधपणे मद्य वाहतूक करणारी मारुती इको क्रमांक एम एच ०२ एफ इ ९९४७ या क्रमांकाची कार जप्त केली. या मध्ये ४०० लिटर तयार ताडी व ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ई अन्वये संशयित आरोपी मोहमद अजीद यांचेवर पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास विलास पाटील करीत आहेत.