पाचोरा ( प्रतिनिधी ) – शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुक कोंडी ,अपघात आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती द्यावी अशी मागणी पाचोरा नगर परिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते संजय वाघ यांनी केली आहे.

भुयारी गटारी आणि रस्ते दुरुस्तीच्या कामांसाठी पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये दीर्घकाळापासून रस्ते खोदून ठेवण्यात आले असून नागरिकांना रस्त्याने वाहनांनी आणि पायी चालणे देखील कठीण झाले आहे या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे.पाचोरा शहरातील सर्वात जास्त वाहतूक असलेला आणि बाजारपेठ असलेला स्टेशनरोड दुरुस्तीसाठी खोदण्यात आला असून केवळ एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. एका बाजूला रस्ता दुरुस्तीसाठी खोदला असून दुसऱ्या बाजूला भुयारी गटारीसाठी रस्ता फोडल्यामुळे दोन्ही बाजूने खराब झाल्याचे चित्र स्टेशन रोड परिसरात आहे या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या हॉटेल्स आणि दुकानांवर वाहनांची गर्दी होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला अडथळा होत असल्यामुळे रस्त्यावर तसेच नगर परिषदेसमोरच वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांना कित्येक वेळी वाहतुकीमुळे रस्त्यात खोळंबून उभे राहावे लागत आहे. सुपडू भादू विद्यालयाजवळ रस्त्याचे देखील दुरुस्तीसाठी खोदकाम करण्यात आले गटारीचे कामदेखील सुरू आहे परंतु हे काम कासवगतीने सुरू असल्याने बाहेरपूरा, देशमुखवाडी परिसरातील नागरिकांसाठी वाहतुकीची समस्या निर्माण झाली नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. प्रकाश टॉकीज चौकात आणि बँकेसमोर लावलेल्या दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते आहे गणेश कॉलनी भागात गटारीचे काम सुरू असल्यामुळे गो.से हायस्कूल मागील रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्ते दुरुस्ती संथ गतीने होण्यामागे असलेल्या कारणांचा शोध घेऊन ठेकेदारांना सूचना देऊन नगरपालिका प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी अशी मागणी संजय वाघ यांनी केली आहे.







