पाचोरा (प्रतिनिधी) – शहराजवळ एक जीवंत काडतुस एक गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोन तरूणांना जळगाव एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. दोघांवर पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारोळा बु” ता. पाचोरा रोडवरील शांताराम सोनजी पाटील यांच्या जुन्या खडीमशिन जवळील महादेव मंदिर परीसरात फिरताना दोन युवकांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध भारतीय कायदा कलम ३ (२५) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


पाचोरा शहरातील हिवरा नदीलगत असलेल्या सारोळा बु” रोडवरील महादेव मंदिर परीसरात दोन युवक गावठी कट्टा बाळगुन असल्याची माहिती जळगांव येथील एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या आदेशानुसार पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, हरीष परदेशी व उमेश गोसावी यांनी सापळा रचून महादेव मंदिर गाठले. रात्री ८ वाजेच्या दरम्यान महादेव मंदिर परीसरात अशोक बाबुलाल पवार (वय – २८) रा. सारोळा बु” ता. पाचोरा व सुरज नारायण शिंदे (वय – ३०) रा. कृष्णापुरी, पाचोरा यांचे जवळ एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतुस व काळ्या रंगाची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल असा ५७ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.
एल. सी. बी. चे विलास पाटील, हरिष परदेशी व उमेश गोसावी यांनी मुद्देमालासह आरोपी अशोक पवार व सुरज शिंदे यांना पाचोरा पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत घोडसे हे करीत आहेत.







