पाचोरा पालिकेचे स्वच्छता अभियान, दिवसात 5 टन कचरा संकलित
पाचोरा (प्रतिनिधी ) – पाचोरा पालिकेने शहरात गुरुवारी स्वच्छ तिर्थ अभियानाअंतर्गत विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी शहरातील प्राचीन राम मंदिर परिसर व त्या आसपासचा नदी परिसर पालिकेच्या कर्मचारी / स्वच्छता कर्मचारी यांनी एकत्र येत स्वच्छता केली.
अभियानात 1 जे.सी.बी., 4 ट्रॅक्टर, 1 घंटागाडी व 60 स्वच्छता कर्मचारी यांच्या श्रमदानातून एका दिवसात तब्बल 5 टन कचरा संकलित करण्यात आला असून यापुढे शहरात नियमित स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन नगरपरिषदेने केलेले आहे. यावेळी पालिकेचे कर निरीक्षक दगडू मराठे, प्रशासकिय अधिकारी चैतन्य राऊत, आरोग्य निरीक्षक विरेंद्र घारु तसेच सर्व मुकादम व सफाई कर्मचारी उपस्थित होते.
सदर मोहीमेअंतर्गत दि.19/01/2024 रोजी कैलामाता मंदिर व परिसर, 20/01/2024 रोजी काकनबर्डी मंदिर व परिसर, 22/01/2024 रोजी मरीमाता/हनुमान मंदिर परिसर, 23/01/2024 विठ्ठल मंदिर व परिसर हायवे लगतचे, 24/01/2024 रोजी बस स्टँड व परिसर या परिसरातील स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले असून या अभियानात जास्तीत जास्ती नागरीक, लोकप्रतिनिधी, सामाजीक संघटना, बचत गटातील महिला यांनी सहभागी होण्याचे आवाहन नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.